चिपळूण : वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ उपसा सुरू

चिपळूण : गेली तीन वर्षे वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ उपशाचे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाला गती यावी, यासाठी जलसंपदा विभागासह ‘नाम फाउंडेशन’ची यंत्रणाही दाखल झाली आहे. पुराचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी शंकरवाडी-नलावडा बंधारा या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पूर नियंत्रण भिंतीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. बहादूरशेखसह आवश्यक सर्व ठिकाणी संरक्षक भिंतींची कामे सुरू आहेत, अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी बुधवारी दिली.

जलसंपदा विभागाबरोबरच आता ‘नाम फाउंडेशन’ ही शहरातील गाळ उपशाच्या कामात सक्रिय झाले आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या नाना पाटेकर यांनी गाळ उपशासाठी दोन पोकलेन चिपळुणात पाठवले आहेत.

या यंत्रणेमार्फत शहरातील पेठमाप, बाजारपेठ गणपती विसर्जन घाट, सुवेज कालवा, गोवळकोट जॅकवेल आणि शिवनदी या ठिकाणचा गाळ काढला जाणार आहे.

या कामाचा शुभारंभ बुधवारी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार निकम म्हणाले की, महापुरानंतर चिपळूण शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये गेली दोन ते तीन वर्षे गाळ उपसा सुरू आहे. यावर्षीही जलसंपदा विभागाने ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान कामाला सुरुवात केली. यामुळे पहिल्यासारखे स्पॉट कमी झालेले आहेत. तरीही या कामाला गती यावी आणि हे काम पुढे काही वर्षे सुरू राहावे, यासाठी ‘नाम फाउंडेशन’कडे सहकार्य मागितले होते.

Kore Mobile

नाना पाटेकर यांनी तातडीने यासंदर्भात निर्णय घेत यंत्रणा चिपळुणात पाठविली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहोत. या कामात सातत्य राहिल्यास येत्या तीन ते चार वर्षात सकारात्मक बदल नक्कीच दिसेल.

७० कोर्टीची कामे पूर नियंत्रणासाठी प्रगतीपथावर चिपळूणला पूरच येऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. शहरात पूर नियंत्रणासाठी सुमारे ७० कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. गाळ उपशासाठी साधारण ७ कोटींचा निधीही शिल्लक आहे, असे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 25/Apr/2025