राजापूर : ओणी येथे भरधाव ट्रकची उभ्या कारला धडक

राजापूर : तालुक्यातील ओणी येथे भरधाव ट्रकने एका थांबलेल्या कारला धडक दिल्याने तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वाजता ओणी गावातील पेट्रोल पंपाच्या समोर घडली. याप्रकरणी ट्रक चालक शिहाबुद्दीन अमीरकन्नु राउतार (वय ४३, रा. पल्लीपुरा, कडईल विड, तलचिरा पो. व्हेट्टीकावाला, कोल्लम, केरळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सतीश रविदास नायक (वय ४५, रा. डोंबिवली, ठाणे) हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मूळगावी उडपी (कर्नाटक) येथे गेले होते. तेथून गोवा-मुंबई मार्गे डोंबिवलीला परत येत असताना ओणी येथे त्यांनी रोजवर गाडी थांबवली होती. त्यांची पत्नी आणि मुलगी गाडीत बसून निघणार होत्या, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अशोक लेलॅन्ड १६१८ पॅक बॉडी ट्रकच्या चालकाने भरधाव वेगात समोरच्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे फिर्यादी यांची गाडी सुमारे २५ ते ३० फूट पुढे फेकली गेली. या अपघातात फिर्यादी सतीश नायक यांच्या डाव्या हाताच्या दंड्याला आणि कोपराला तसेच कमरेला मार लागला. त्यांच्या पत्नी कात्यायनी नायक यांना डोक्याला, चेहऱ्याला आणि खांद्याला तर मुलगी समीक्षा नायक हिला कमरेला आणि डोक्याला मुका मार लागला आहे.

या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक चालक शिहाबुद्दीन राउतार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 26/Apr/2025