रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामकाजाची पाहणी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रविवारी केली. १५ कोटी रुपये खर्च करुन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने या ठिकाणी होणार असून डिसेंबरमध्ये या क्रीडा संकुलाचे लोकार्पण होईल, अशा पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रविवारी रत्नागिरीत आलेल्या पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सकाळी ७ वाजताच एमआयडीसीतील क्रीडा संकुलाला भेट दिली. याठिकाणी विविध उपक्रमांसाठी १५ कोटीचा निधी डॉ. सामंत यांनी क्रीडा विभागाला उपलब्ध करुन दिला आहे.
क्रीडा विभागाचे कार्यालय उभारुन काही वर्ष झाली होती. क्रीडांगणे, खेळाडूंच्या वास्तव्यासाठी निवासव्यवस्था यांची कामे शिल्लक होती. यासाठी डॉ. सामंत यांनी निधी दिला होता. कबड्डी, खोखो, बॅटमिंटन या सारख्या खेळांसाठी मैदानाची उभारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे फुटबॉल, हॉकीसह अॅथलेटीक्सच्या मैदानाचीही उभारणी केली जाणार आहे. अॅथलेटीक्ससाठी सिंथेटीकचे मैदान तयार केले जाणार आहे. या क्रीडा संकुलाला भेट देऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व त्यांना सूचना दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 28/Apr/2025














