देवरूख : कोकणातील अठरा गावांतून वाहणाऱ्या ऐतिहासिक सप्तलिंगी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी दुसरी सप्तलिंगी नदी परिषद दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता छ. संभाजी महाराज सभागृह पं स संगमेश्वर (देवरुख) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेसाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्य शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. सप्तलिंगी नदी ही ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्वाची नदी असून तिच्या शुद्धीकरणासाठी २०१४ पासून विविध योजनांतर्गत प्रयत्न सुरु आहेत.
अद्याप प्रभावी अंमलबजावणी अभावी अपेक्षित यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने क्रांती व्यापारी संघटना देवरुख आणि संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्म फ्रेश FPO कंपनी आणि पंचायत समिती संगमेश्वर यांच्या तर्फे पहिली परिषद आयोजिण्यात आली हातो. यामध्ये नदी प्रेमापोटी सुमारे ७५ जणांनी सहभाग नोंदवला होता.
या पार्श्वभूमीवर आता आमदार शेखर निकम यांनी सरकारी पातळीवर पुढाकार घेऊन सरपंच शासकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पुढील कामकाज करण्यासाठी दुसरी परिषद आयोजित केली आहे. नदीपात्रातील गाळ काढणे व नाल्यांचे नियोजन तटबंदी, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती आरोग्य जनजागृती, पाणलोट क्षेत्र विकास पर्यटनदृष्ट्या उपयोगी पायाभूत सुविधा निर्माण यामध्ये नैसर्गिक जल पर्यटन सोबत धार्मिक पर्यटन अंतर्गत सप्तलिंगी नदी काठावरील सात शिवलिंगाचा विकास करणे सप्तलिंगी यात्रे मध्ये १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा पर्यटकांना लाभ मिळवून देणे या उद्देशाने आयोजित परिषद दुसऱ्या टप्यावर पोहोचली आहे.
सप्तलिंगी नदीच्या काठावर सात मुख्य शिवलिंगांनसोबत अनेक पौराणिक स्थळे आहेत सात शिव लिंग काठावर असल्याने तिचे नाव सप्तलिंगी पडले आहे. छ. शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय मोहिमेवेळी या परिसरातील अनेक स्थळांना भेटी दिल्या होत्या व पुढे दक्षिणे कडे प्रयाण केले होते, सप्तलिंग काठावरील ७ आणि एकूण यात्रेतील १२ ज्योतिर्लिंग मंदिरे, ऋषी-मुनिंच्या समाध्या, सोळजाई माता यासारख्या स्थळांनी या परिसराला ऐतिहासिकतेची ओळख दिली आहे.
अशा ठिकाणी प्रक्षणमुक्त आणि स्वच्छ नदीचे महत्त्व अधिकच वाढते. या परिषदेत आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर सचिव जलसंपदा महाराष्ट्र शासन, जिल्हा अधिकारी रत्नागिरी, कार्यकारी अभियंता जलसंपदा रत्नागिरी, उपजिल्हाधिकारी री. ह. यो. रत्नागिरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा रत्नागिरी, जिल्हा कृषी अधिक्षक रत्नागिरी, उपसंचालक सामाजिक वनीकरण रत्नागिरी, मुख्य वनसंरक्षक चिपळूण, तहसीलदार संगमेश्वर (देक्रुख), गट विस्तार अधिकारी संगमेश्वर (देवरुख) मुख्याधिकारी देवरुख नपं, सर्व १८ गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच सप्तलिंगी काठावरील देवस्थान ट्रस्टी सहभागी होणार आहेत.
या परिषदेनंतर प्रत्येक गावात स्थानिक समित्या स्थापन करून नदीच्या सातत्यपूर्ण निगा राखली जाणार आहे. ग्रामपंचायतींनी स्वच्छता अभियान व प्लास्टिकविरोधी आदेश तत्काळ पारित करावेत असा ठराव करण्यात येणार आहे.
चिपळूणचे शेखर गोविंदराव निकम यांनी सर्व संबंधित विभागांना स्पष्टपणे सांगितले आहे की, ही केवळ एक नदी नव्हे तर आमच्या संस्कृतीचा प्रवाह आहे. तिचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. क्रांती व्यापारी संगमेश्वर संस्थेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या सप्तलिंगी परिषदेचे स्वरूप जनतेमध्ये तसेच शासकीय सरकारी पातळीवर रुजवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 28/Apr/2025














