चिपळूण : राजकीय संघटन असेच वाढत नाही. त्यातील कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे. तो नेहमी कार्यमग्न असायला हवा. संघटनेच्या सभासद नोंदणीत जाती धर्माला स्थान देऊ नका. मीपणा आणि गर्विष्ठपणा दाखवू नका. कार्यकर्त्यांनी जोमाने सभासद नोंदणी केली तरच येणाऱ्या निवडणूका सोप्या जाणार आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे अधिकार जिल्हा पातळीवरच पदाधिकाऱ्यांना राहतील, घडाळ्याच्या चिन्हावरच या निवडणूका लढवायच्या आहेत. त्यादृष्टीने तयारीला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सावर्डेतील संवाद मेळाव्यात केले.
चिपळूण, संगमेश्वर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकत्यांचा संवाद मेळावा रविवारी सावर्डे येथे झाला. मेळाव्याच्या सुरवातीस आमदार शेखर निकम म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात विकास कामांना चालना देण्याची भूमिका घेतल्याने २६०० कोटीची विकास कामे करता आलो. यापुढील काळात संघटना अधिक मजबूत व्हायला हवी. अजित पवार म्हणाले, निवडणूका या ह्लक्यात घेऊ नका. कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच झटून कामाला सुरवात करावी, आपल्या नगरात, प्रभागात एवढेच नव्हेतर कुटुंबातीलही व्यक्तींना पक्ष कार्यात जोडण्याचा प्रयत्न करा. लाडकी बहीण योजना बंद होईल अशी अफवा विरोधक पसरवत आहेत, मात्र सरकार कदापि ही योजना बंद करणार नाही. ज्या महिलांचे अडीच लाख उत्पन्न आहे, इतर कोणत्याही योजनेचे लाभ घेत नाहीत, अशा महिलांना ही योजना सुरूच राहणार आहे.
नोकरीविषयक अॅपचे उद्घाटन
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार निकम यांनी पुढाकार घेत नोकरीविषयक अँपची निर्मिती केली, त्याचे उदघाटन पवारांच्या हस्ते करण्यात आले, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी आगामी काळात आमदार शेखर निकम यांना मंत्रीमंडळात संधी देण्याची मागणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 28/Apr/2025














