खेड : तालुक्यातील आंबडस येथे एका तरुणाने हापूस आंबे स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुगल पे द्वारे आगाऊ रक्कम स्वीकारूनही आंबे न दिल्याने फसवणूक झालेल्या एका ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे मुंबई आणि पुणे येथील अनेकजण गावी येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने आंबे मागवतात. याच संधीचा फायदा घेत आंबडस येथील एका तरुणाने सोशल मीडियावर स्वस्त दरात हापूस आंबे घरपोच देण्याची जाहिरात केली. या आमिषाला बळी पडून अनेक ग्राहकांनी तरुणाच्या गुगल पे खात्यावर ३ हजार रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठवली. पैसे पाठवूनही अनेक दिवस उलटून गेल्यावर ग्राहकांना आंबे मिळाले नाहीत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी तरुणाच्या घरी जाऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो घरी सापडला नाही, असे तक्रारदारांनी सांगितले.
या घटनेमुळे आंबडस परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 28/Apr/2025














