‘त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : खासदार सुनील तटकरे

दापोली : जलजीवनच्या पाणीपुरवठा योजनेत एकाच ठेकेदाराला काही योजनांची कामे देण्यात आली आहेत आणि म्हणूनच या कामांना विलंब होत असल्याने त्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, असे थेट निर्देश बैठकीतूनच फोन लावत खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

दापोली पंचायत समितीमध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये आढावा घेताना हा प्रकार घडला.

तालुक्यात अनेक ठिकाणी घरोघरी नळ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून पाणी योजनेंची कामे सुरू आहेत; मात्र काही गावांमधील योजना रखडल्या आहेत. एकाच ठेकेदाराला काही गावांमधील जलजीवन मिशन या नळपाणी योजनेची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळेच योजना रखडल्या आहेत, अशी माहिती या बैठकीतून पुढे आली. यावेळी अनेकांना तक्रारी केल्या. या सगळ्याची गंभीर दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे, असे निर्देश थेट बैठकीतून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन लावत दिले.

पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीला दापोलीचे प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, रमा बेलोसे, नेहा जाधव, दापोलीच्या नगरसेविका साधना बोत्रे आदी प्रशासकीय खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

दापोली शहरातील पाण्याचाही प्रश्न
दापोली शहरातील पाण्याचाही प्रश्न यावेळी समोर आला होता. नगरसेविका साधना बोत्रे यांनी हा विषय या बैठकीत मांडला. यावरून मुख्याधिकारी यांनीही प्रशासनाकडून पाण्याचे नियोजन सुरू असून, वेळप्रसंगी टँकरची तयारी ठेवली आहे, अशी माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 29/Apr/2025