दापोलीत ११, १२ मे रोजी ‘समर सायक्लोथॉन’

दापोली : सायकल संस्कृती वाढावी. सायकलिंगबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबच्यावतीने ‘दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सीझन ७’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ व १२ मे रोजी सकाळी दापोलीत सोहनी विद्यामंदिर मैदानात होणार आहे. त्यामध्ये १५० किमी सायकल चालवावी लागणार आहे.

दापोलीत होत असलेल्या या सायक्लोथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील तसेच इतर राज्यांतील अनुभवी सायकलपटू आपल्या कुटुंबीयांसह सहभागी होणार आहेत. सायकल चालवण्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे लक्षात घेता नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही स्पर्धा विविध गटांमध्ये होणार असून, त्यात १ ते १५० किमी अंतराचे वेगवेगळे राईड्स असतील. ३० व ५० किमी कोस्टल सिनिक रूट, ४ ते १५० किमी शॉर्ट सिटी लूप आणि १ व २ किमी फनराईड अशा प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित केली आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

शॉर्ट सिटी लूपमध्ये ५० किमी, ७५, १००, १२५ आणि १५० किमी पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे २००, ३००, ४००, ५०० व ६०० रुपयांची रोख पारितोषिके मिळतील. याशिवाय इतर विशेष बक्षिसांचीही घोषणा केली आहे. बारा तासांच्या मर्यादेत १५० किमी अंतर पार करण्याचे आव्हान सहभागी स्पर्धकांसमोर असेल. ही फनराईड विनामूल्य असून, नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://www.townscript.com/e/ dsc7 या लिंकवर जाऊन अर्ज करता येईल.

समुद्रकिनाऱ्यावरील गावांमधून राईड
५० किमी कोस्टल सिनिक रूटमध्ये सोहनी विद्यामंदिर दापोली ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णे, दापोली अशा नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावरील गावांमधून राईड होईल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेंपो व वैद्यकीय मदतीची सोय केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 29/Apr/2025