राजापूर : आपत्ती आराखडा तयार करण्याच्या सूचना

राजापूर : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करत सज्ज राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी राजापूर आणि लांजा तालुक्यातील प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी राजापूर, लांजा तालुक्याचा संभाव्य नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, पूरस्थिती आदींविषयी सविस्तर माहिती आणि उपाययोजनांचा आपत्ती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यातील विविध विभागाचा प्रशासकीय आढावा बैठक झाली. यावेळी संभाव्य नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, दरडी कोसळणे, पूरस्थिती आणि त्यावरील उपापयोजना आदींच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

पावसाळ्यामध्ये वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, भूस्खलन, दरड कोसळणे, राजापूरातील पूरस्थिती आदींच्या अनुषंगाने यावेळी प्रशासकीय आढावा घेण्यात आला. अर्जुना-खोरनिनको धरणाच्या येथे पावसाळ्यामद्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणारे साहित्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

या चर्चेच्यावेळी कार्यालयांमध्ये आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याच्या सूचना डॉ. जॅस्मिन यांनी यावेळी दिल्या. शहरामध्ये निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचे काम पाटबंधारे विभागातर्फे सुरू आहे. मात्र, उपसलेल्या गाळाची नदीपात्रातून अन्यत्र वाहतूक न करता तो गाळ तसाच पिचींग करून ठेवण्यात येत आहे. पिचींग केलेला गाळ पावसाळ्यामध्ये पाण्यासोबत पुन्हा नदीपात्रामध्ये येण्याची आणि गाळाची समस्या जैसे थे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकडे राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीमध्ये प्रशासनाचे लक्ष वेधले.

उपसा झालेला गाळ आणि नदीपात्रातून झालेली गाळाची वाहतूक यासंबंधित सविस्तर आढावा घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी यावेळी स्पष्ट केले.

महामार्गावरील राजापूर डेपोसमोरील भागामध्ये वाहनांची वर्दळ वाढली असून या ठिकाणी सर्व बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे संबंधित विभागासोबत बैठक घेवून योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांच्यासह तहसीलदार विकास गंबरे, प्रियांका ढोले आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 29/Apr/2025