राजापूर : दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत जाणवणारी तीव्र पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर करावी, यासाठी तालुक्यातील कोदवली मांडवकरवाडीतील ग्रामस्थांनी, ग्रामविकास सेवा संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी कोदवली नदीवर सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्यात येत असून, त्यासाठी त्यांनी आवश्यक लाखो रुपयांचा निधी उभारण्यासाठी स्वतः लोकवर्गणी गोळा केली. त्याला विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याचे सकारात्मक बळही मिळाले आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता संस्थेच्या सहकार्याने कोदवलीतील ग्रामस्थांनी स्वतःच लोकसहभागातून बंधारा बांधत साऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
कोदवली येथे बांधण्यात येत असलेल्या या बंधाऱ्याच्या कामाचा आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अॅड. यशवंत कावतकर, सरपंच प्रणोती भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास सेवासंस्थेचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष जयवंत मांडवकर, रवींद्र नागरेकर, कोदवलीचे माजी सरपंच विलास गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार सामंत यांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी ग्रामविकास सेवा संस्था आणि ग्रामस्थ यांनी राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना या बंधाऱ्यासाठी निधीची कमतरता पडू न देता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित केले. यावेळी त्यांनी कोदवलीतील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नादुरुस्त छप्पर, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासित केले.
कोदवली मांडवकरवाडीला एप्रिल-मे महिन्यांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. १६५ कुटुंबे आणि ५५० लोकवस्ती असलेल्या मांडवकरवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी नळपाणी योजना राबविण्यात आलेली आहे. त्यासाठी नदीपात्रालगत विहीर बांधण्यात आलो आहे; मात्र, उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडते. त्यामुळे नदीपात्रालगत बांधलेल्या विहिरीतील पाणीसाठा कमी होतो. वाडीमध्येही तीन-चार विहिरी असून त्यामधीलही पाणीसाठ्याची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सिमेटकॉक्रिटचा बंधारा बांधण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. अखेर ग्रामस्थ आणि ग्रामविकास सेवा संस्थेने लोकवर्गणी गोळा करत निधी ऐनि उभारला. त्याला संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, श्री श्री रवीशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था, कोदवलीतील अन्य वाड्यांमधील ग्रामस्थ यांचे पाठबळ मिळाले.
सिमेंट बंधाऱ्याचा असा उपयोग
कोदवली नदीपात्रात बांधण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या बंधाऱ्यामुळे त्या भागामध्ये पाणीसाठा होईल आणि गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेच्या नदीपात्रालगतच्या मुख्य विहिरीची पाण्याची पातळी वाढण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार असल्याची माहिती ग्रामविकास सेवासंस्था, मांडवकरवाडीचे सचिव विलास पळसमकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 29/Apr/2025














