देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाला सैनिक स्कूल सुरु करण्याची परवानगी

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळासाठी आज आनंदाची बातमी आहे. संस्थेला संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सैनिक स्कूल सोसायटीकडून न्यू इंग्लिश स्कूलला संलग्न सैनिकी शाळा सुरू करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे, अशी माहिती संस्थेचे सदानंद भागवत यांनी दिली.

केंद्र सरकारने सुमारे पाच वर्षांपूर्वी देशभरात १०० सैनिकी शाळा सुरू करण्याची योजना आखली होती. या योजनेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने राष्ट्रहिताच्या विचारांनी तातडीने प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेची तीन वेळा कसून तपासणी केली. या तपासणीनंतर संस्थेच्या प्रयत्नांना यश आले असून, आज २९ एप्रिल २०२५ रोजी संस्थेला सैनिकी शाळा सुरू करण्याची रीतसर परवानगी प्राप्त झाली आहे.

या महत्त्वपूर्ण यशामध्ये संस्थेचे पदाधिकारी, न्यू इंग्लिश स्कूल देवरुखचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच, केंद्रीय मंत्री आदरणीय श्रीपादजी नाईक यांच्या माध्यमातून सदानंद भागवत यांनी संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंग यांची दिल्लीत भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सैनिक शाळेमुळे संस्थेला समाज घडवण्याची आणखी एक संधी आणि जबाबदारी मिळाली आहे, याचा संस्थेला विशेष आनंद आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ४०० मीटर रनिंग ट्रॅक, विविध खेळांची मैदाने, इंडोअर क्रीडा सुविधा, बास्केटबॉल कोर्ट आणि शहीद जवान स्मारकासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

सैनिकी शाळेच्या परवानगीमुळे संस्थेकडून होणाऱ्या राष्ट्रसेवेचे एक छोटेसे वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे मत सदानंद भागवत यांनी व्यक्त केले. संस्थेचे आणि विशेषतः न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेचे या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 29/Apr/2025