जागतिक परिषदेत झळकणार कोकणचे पालखी नृत्य

◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर रत्नागिरीतील नादब्रह्म पथक सादर करणार कला

रत्नागिरी : कोकणातील शिमगा (होळी) या उत्सवात पालखी नृत्य एक प्रमुख आणि खास आकर्षण असते. याचीच झलक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर २ मे रोजी सादर केली जाणार आहे. शहरानजीकच्या नाचणे येथील नवलाई नादब्रह्म ढोल-ताशा व पालखी नृत्यपथक या मंडळाला याची संधी मिळाली आहे. निमित्त आहे ‘वेव्हज २०२५’ जागतिक परिषदेचे देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे.

१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. १ ते ४ मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

शिमगा आणि पालखी नृत्य कोकणातील एक खास आणि पारंपरिक उत्सव आहे. जो धार्मिकता, सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतिक आहे. ही एकप्रकारची कलाच आहे. ही कला आता ‘वेव्हज २०२५’ यामध्ये सादर होणार आहे. नाचणे येथील नवलाई नादब्रह्म पथकाला याचा मान मिळाला असून गेली अनेक वर्षे हे पथक पालखी व ढोल नृत्य सादर करत आहे. २ मे रोजी रात्री हा कार्यक्रम होणार आहे. एकंदरीत कोकणचा शिमगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर सादर होणार आहे. एकूण २५ जणांचे हे पथक आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत सादरीकरणाची संधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही या परिषदेत सहभाग असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:40 AM 30/Apr/2025