चिपळूण : खेरशेत-कळंबुशीवरील अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील खेरशेत-कळंबुशी या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवजड वाहनांच्या वाहतुकीने दुरवस्था झाली आहे. ही वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणपत चव्हाण यांनी केली आहे. गतवर्षी या रस्त्याचे ग्रामसडक योजनेतून एक कोटी २० लाख रुपये खर्चुन भराव, खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यावर असलेल्या कासे येथे यंत्राने गडनदीतील वाळू उपसा करण्यात येत आहे. सात ते आठ ब्रास वाळू भरलेल्या डंपर गाड्या या रस्त्याने वाहतूक करताना दिसतात.

या वाहतुकीने कासे ते खेरशेत रस्ता ठिकठिकाणी दबला आहे. बाजूपट्ट्या गायब झाल्या आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दिवस-रात्र वाळू वाहतूक डंपरने केल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी सांडत आहे. रस्ता निसरडा व चिखलमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 01/May/2025