चिपळूणचा वैभवशाली इतिहास पुस्तकबद्ध

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेतर्फे आज (दि. १ मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेने तयार केलेल्या वैभवशाली चिपळूण या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. तसेच दर महिन्याच्या १ तारखेला शहरातून काढण्यात येणारी सायकल व पायी फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.

चिपळूण नगर परिषदेची वाटचाल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे सुरू झाली आहे. त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा), न.प. संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अन्य सामाजिक, सांस्कृतीक संस्थांच्या सहकायनि वर्षभर उपक्रम घेतले जात आहेत. त्यानुसार मध्यंतरात शब्दांची रत्ने अर्थात स्थानिक बोलीभाषेतील दुर्मीळ होत चाललेले शब्द संकलित करूनपुस्तक तयार करण्यात आले.

आता चिपळूण शहराचा इतिहास ‘वैभवशाली चिपळूण’ या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर उलगडला जाणार आहे. चिपळूण शहराला चालुक्य राजघराण्यापासूनचा इतिहास असल्याच्या ऐतिहासीक खुणा तसेच पौराणिक संदर्भ आढळून येत आहेत. या सर्व संदर्भ व खुणांचा मागोवा घेणारे व शहराच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे वैभवशाली चिपळूण या पुस्तकाची निर्मिती चिपळूण न.प.ने केली आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आ. शेखर निकम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रम अंतर्गत सकाळी ७ वा. ध्वजारोहण, त्यानंतर सायकल व चालत फेरी, सकाळी ९ वा. वैभवशाली चिपळूण पुस्तकाचे लोकार्पण आदी उपक्रम चिपळूण न.प. प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 01/May/2025