लांजा शहरातील सर्विस रोड डांबरीकरणाऐवजी होणार काँक्रिटचे!

लांजा : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच लांजा शहरातील सर्विस रोडचे कामही सुरू आहे. हे सर्विस रोड पूर्वी डांबरीकरणाचे होणार होते, परंतु लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा केल्यामुळे आता ते काँक्रिटचे होणार आहेत, अशी माहिती आमदार सामंत यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच शहरातील सर्विस रोडही काँक्रिटचे असावेत, यासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी यासंदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आता लांजा शहरातील सर्विस रोड डांबरीऐवजी काँक्रिटचे बनणार आहेत.

या निर्णयाबद्दल बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, काँक्रिटचे रस्ते अधिक टिकाऊ असतात आणि त्यामुळे लोकांना आरामदायक प्रवास करता येतो. डांबरी रस्ते साधारणपणे तीन ते चार वर्षे टिकतात, तर काँक्रिटचा रस्ता २५ ते ३० वर्षे टिकू शकतो. याच उद्देशाने शहरातील सर्विस रोड काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे लांजा शहरातील नागरिकांची खड्ड्यांच्या त्रासातून कायमची मुक्ती होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 02/May/2025