चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी येथील सूरज शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला. खा. नारायण राणे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक आदींकडे पाठपुरावा केला. यानंतर त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन हा विषय सांगितला. यावर आपण हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
प्रा. आ. केंद्र शिरगावचे ३० खाटांचे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी सूरज शिंदे यांनी २९ जुलै २०२४ मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदना मार्फत केली होती. त्या नंतर सदरच्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी २१ ऑगस्ट २०२४ रोजी सदरचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पुढील कार्यवाही करिता प्रस्ताव सादर केला.
या मागणीचा गांभीर्याने विचार करून जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ग्रामीण रुग्णालय श्रेणीवाढ करण्याकरिता लागणारी सर्व कागदपत्रे प्रा. आ. केंद्र शिरगावकडून मागवली. सदरची कागदपत्रे जमवाजमव करण्या करिता तेथील अधिकारी व कर्मचारी यांची अक्षरशः दमछाक झाली. याकामी सूरज शिंदे यांनी सर्वतोपरी मदत केली. यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा प्रस्ताव मा. उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांच्याकडे सादर केला. श्रेणी वाढ प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आयुक्तालय, आरोग्य सेवा (रुग्णालय) राज्यस्तर, मंत्रालयात अंतिम मंजुरीकरिता आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगावचे श्रेणी वर्धन होऊन ३० खाटांचे अत्याधुनिक सुविधांचे ग्रामीय रुग्णालय होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याकरिता एकूण २२ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही श्रेणीवर्धन प्रक्रिया जलदगतीने मंजूर होण्यासाठी सूरज शिंदे यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. यावेळी ना. प्रकाश आबिटकर यांनी याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू, अशी ग्वाही दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 05/May/2025














