चिपळूण : गेल्या महिनाभरापूर्वी भाजपा चिपळूण ग्रामीण व शहर मंडळ अध्यक्ष निवडी जाहीर करण्यात आल्या. तर आता भाजपा उत्तर व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी चिपळूण कापसाळ येथील सतीश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल श्री. मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेत बदल होत आहेत. यानुसार गेल्या महिन्याभरापूर्वी भाजपा चिपळूण ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी खेर्डी येथील विनोद भुरण तर शहर मंडल अध्यक्षपदी शशिकांत मोदी यांची निवड करण्यात आली. तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी असलेले केदार साठे यांना थांबवून सतीश मोरे यांची उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चिपळूण कापसाळ येथील सतीश मोरे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत पक्ष वाढवण्यासाठी अथक मेहनत घेतली. तर आता गुहागर विधानसभा संयोजक पदाची जबाबदारी सांभाळत होते. या पदाच्या माध्यमातून गुहागरमध्ये भाजपाचे संघटन मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले. तर आता सतीश मोरे यांच्या पक्षीय कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर भाजपा उतर त्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल सतीश मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना भाजपा उतरत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून आपण भाजपा पक्षात कार्यरत आहोत. भाजपा संघटन मजबूत होण्यासाठी प्रयत्न करीत राहिलो. यासाठी भाजपा नेतृत्व व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेहमीच पाठबळ मिळाले. आता तर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व पक्ष नेतृत्वाने आपल्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 14/May/2025














