रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला ३५६ जणांची गैरहजेरी

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी पार पडली. रत्नागिरी तालुक्यातील दोन उपकेंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी ८२५ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४६९ उमेदवार परीक्षेसाठी हजर होते तर ३५६ विद्यार्थी गैरहजर होते. उपस्थितीचे प्रमाण ५६.८५ टक्के होते.

महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सकाळी ११ वाजता पेपर असल्यामुळे परीक्षार्थी सकाळी ९ वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैर किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पटवर्धन हायस्कूल केंद्रावर एकूण ३६० उमेदवारांची बैठक व्यवस्था केली होती. त्यापैकी २२२ विद्यार्थी हजर तर १३८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. फाटक हायस्कूल या केंद्रावर ४६५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती, त्यापैकी २४७ विद्यार्थी उपस्थित तर २१८ विद्यार्थी अनुपस्थित होते.

कोणत्याही परीक्षा उपकेंद्रावर कोणताच अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

Tava mahotsav

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 03/Jun/2025