राजापूर : घेरा यशवंतगडाचे नवीन बांधकाम ढासळले

नाटे : राजापूर तालुक्यातील साखरी नाटे ग्रा. पं. हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजीचे काम सुरू असताना पावसाच्या पहिल्याच सरीमुळे हे बांधकाम ढासळले आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडही निकृष्ट दर्जाचा वापरण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे सरपंच संदीप बांदकर आणि काही शिवप्रेमींनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. या कामासाठी सुमारे साडेतीनशे फूट खोल बोअरवेल काढून पाण्याचा वापर होत होता; मात्र हे पाणी खारट असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.

सुरू असलेले बांधकाम आठ दिवसांपूर्वी ढासळल्यानंतर पुनर्बाधणीसाठी कोणतीही पावले ठेकेदाराकडून उचलली गेली नाहीत. त्यामुळे नाटे परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संतप्त झाले असून शासनाने पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यावर शिवसेना राजापूर तालुकाध्यक्ष दीपक नागले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली असून अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींची बदनामी होत असेल, तर ते कदापी सहन केले जाणार नाही, असे सांगितले.

Tata nexon

कधीही विश्वासात घेतले नाही..
घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला आठ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे. दीड वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शिवप्रेमींना कधीही विश्वासात घेतले गेलेले नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

ऐतिहासिक संदर्भ देखील मिटविले जाताहेत..
हे काम करत असताना ऐतिहासिक संदर्भ देखील मिटविले जात असल्याचा आरोप शिव संघर्ष संघटना नाटेचे अध्यक्ष मनोज आडविलकर यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 04/Jun/2025