लांजा, दि. ०४ जून २०२५ : जमिनीच्या जुन्या वादातून लांजा तालुक्यातील हर्चे, देऊळवाडी येथे एका व्यक्तीला त्याच्याच घरात घुसून तिघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना १ जून २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता घडली. या हल्ल्यात पीडित व्यक्तीच्या गुप्तांगावर लोखंडी अवजाराने वार करण्यात आले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडले काय?
विनोद गोपाळ शेलार (वय ४८, रा. हर्चे, देऊळवाडी, ता. लांजा) हे १ जून रोजी आपल्या घरातील हॉलमध्ये उभे असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील अशोक शेलार, ज्याच्यासोबत फिर्यादी विनोद शेलार यांचा जमिनीचा वाद आहे, त्याने जुन्या रागातून विनोद शेलार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हॉलमध्ये वस्तू घेताना झालेल्या आवाजावरून हा वाद विकोपाला गेला आणि सुनील शेलारने विनोद शेलार यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी सुनील शेलारसोबत असलेल्या आणखी दोन महिला आरोपी तिथे आल्या आणि त्यांनीही विनोद शेलार यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण सुरू असताना, आरोपी सुनील शेलारने कोणत्यातरी लोखंडी अवजाराने विनोद शेलार यांच्या गुप्तांगावर वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर विनोद शेलार यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दि. ०३ जून २०२५ रोजी सकाळी ७:२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२), आणि ३(५) प्रमाणे नोंदवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 04-06-2025














