Breaking : रत्नागिरीत ‘ब्राऊन हेरॉईन’सह एकाला अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

रत्नागिरी, ०४ जून २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत एका व्यक्तीला ‘ब्राऊन हेरॉईन’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे.

कारवाईचा तपशील :

पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक ०३ जून २०२५ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम.आय.डी.सी. परिसरात गस्त घालत होते. यावेळी कुवारबाव ते मिरजोळे रोडवरील कांचन हॉटेलच्या पुढील बाजूस शफाकत हसन आदम राजपुरकर (वय ४०, रा. देवरुख, खालची आळी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा संशयित व्यक्ती ‘ब्राऊन हेरॉईन’ हा अंमली पदार्थ आणि इतर संबंधित साहित्यासह पोलिसांना मिळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीचा पूर्वेतिहास :

Shoping fest Khabardar

आरोपी शफाकत हसन आदम राजपुरकर याच्या ताब्यातून १० ग्रॅम वजनाचा ‘ब्राऊन हेरॉईन’ हा अंमली पदार्थ आणि इतर संबंधित वस्तू असा एकूण ६७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी शफाकत हसन आदम राजपुरकर याच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ संदर्भात गुन्हे दाखल आहेत. देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४/२०२४ आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२५ अन्वये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

कामगिरी करणारे पथक :

ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली:
स.पो.नि. श्री. प्रमोद वाघ, पो.हवा/९०९ विजय आंबेकर, पो.हवा/१४०७ दिपराज पाटील, पो.हवा/२६२ विवेक रसाळ
पो.कॉ/२१५ अतुल कांबळे

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाकडून अशा प्रकारच्या कारवाया तीव्र केल्या जातील, असे संकेत या घटनेतून मिळत आहेत. नागरिकांनी देखील अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.