रत्नागिरीत अपार्टमेंटमध्ये गोवंशसद़ृश प्राण्याचे मांस सापडल्याने खळबळ

रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश सदृश प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडल्याची धक्कादायक घटना मंगळवार रात्री 9 वा. सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अपार्टमेंटचा वॉचमन रणजीत दमाई, त्याची पत्नी आरती रणजीत दमाई (दोन्ही मूळ रा.नेपाळ सध्या रा. यशोधा अपार्टमेंट संसारे गार्डन एकता मार्ग, रत्नागिरी) आणि नासिर मुल्ला (रा. रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात रणजीत दमाईला पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी संध्याकाळी मारुती मंदिरनजीकच्या एकता मार्ग येथे गोवंश सदृश्य प्राण्याचा पाय टाकलेला आढळून आल्याने सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच शहर पोलिसही तत्काळ दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका दुचाकीवरून तिघेजण येऊन त्यापैकी एक जण हातात पिशवी घेऊन निघून गेल्याचे दिसून आले.

या व्यक्तीचा शोध घेतला असता तो नजीकच्या यशोदा अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना एका टबमध्ये गोवंशाच्या मागच्या बाजुचा पाय आणि अंदाजे तीन ते चार किलो गोमांस आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून मांस जप्त केले आणि वॉचमनच्या पत्नीला तत्काळ ताब्यात घेतले. तेव्हा तिने आपल्या पतीने हे मांस नासीर मुल्ला याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, गोरक्षक सुशील कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत वॉचमनच्या घरात सापडलेले मांस गोमांस असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करून सविस्तर पंचनामा करून ते जप्त करण्यात आले. ते गोमांसच आहे की अन्य प्राण्याचे मांस आहेत ते तपासणीसाठी खेडशी येथील लॅबला पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी आरती रणजीत दमाई, रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299, 325, 238, 3 (5) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 ए, 5 बी, 5 सी, 9 ए आणि 10 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 05-06-2025