पूल व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षांपेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वारी महामार्ग सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना साकव (पूल) कोसळून दुर्घटना घडली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री भोसले यांनी पूल आणि साकवसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सचिव (बांधकाम) संजय दशपुते उपस्थित होते.

भोसले म्हणाले, की पूल व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर एखादा पूल धोकादायक असेल; तर त्याठिकाणची वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात यावा. तसेच त्या ठिकाणी नवीन पूल, साकव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. धोकादायक पुलाच्या ठिकाणी कायमस्वरूपी हलवता न येणारे बॅरिकेड लावावेत. स्थानिक पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत यांना धोकादायक पुलाविषयी माहिती कळवावी. पर्यायी रस्ता सुस्थितीत असेल याची काळजी घ्यावी. धोकादायक पुलावर फलक लावण्यात यावेत. महामार्गावरील वापरात नसलेल्या पुलांच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून ते बंद करावेत. सार्वजनिक इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 18/Jun/2025

Infigo eyecare