राज ठाकरेंचं मुख्याध्यापकांना पत्र : सक्तीच्या हिंदीला मनसेचा विरोध

रत्नागिरी, १८ जून २०२५ : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत त्यांनी राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले असून, आज रत्नागिरीतील मनसे कार्यकर्त्यांनी हे पत्र जिल्ह्यातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवले.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “मुलांवर भाषा लादण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे.” त्यांच्या मते, यामुळे मुलांचे आणि मराठी भाषेचे मोठे नुकसान होणार आहे. “मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकतात, पण आतापासूनच भाषेचे ओझे त्यांच्यावर कशाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी शाळांना आवाहन केले आहे की, त्यांनी सरकारच्या या राजकारणाला बळी पडू नये. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी या सक्तीच्या हिंदीला विरोध करावा, असे आवाहन मनसे अध्यक्षांनी केले आहे. या पत्रामुळे शिक्षण वर्तुळात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 18-06-2025

Mahrashi karve ANM