चिपळूण : कोळकेवाडीत अस्वलाचे दर्शन

चिपळूण : कोळकेवाडीत रस्त्यावर भरदिवसा अस्वल दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी कोळकेवाडी धरण प्रकल्पाच्या परिसरात एक अस्वल फिरताना काही स्थानिकांना दिसले. येथील एका सुरक्षारक्षकाने या अस्वलाचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अस्वल रस्त्यालगतच्या परिसरातून जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अस्वलासारखा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीजवळ दिसल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

या घटनेमुळे वन विभागाचीही चिंता वाढली आहे. अस्वलाचा अधिवास सामान्यतः घनदाट जंगलात असतो. असे असताना ते मानवी वस्तीजवळ कसे आले, याचा तपास वन विभाग करत आहे. खाद्य आणि पाण्याच्या शोधात हे प्राणी वस्तीकडे येत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे; मात्र, यामुळे मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 20/Jun/2025

Mahrashi karve ANM