पाली (सागर पाखरे): महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय पाली येथे भव्य कॅन्सर (कर्करोग) निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिला आणि पुरुषांसाठी कॅन्सर मोबाईल व्हॅनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कॅन्सरच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत साहेब यांचे वडील आणि महाराष्ट्रातील प्रथितयश उद्योजक रवींद्र सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पाली, डॉ. विकास कुमरे यांनी कर्करोगाविषयी सविस्तर माहिती दिली आणि सर्वांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन साळुंखे यांनीही कर्करोगाविषयी जनजागृतीपर विचार व्यक्त केले.
याप्रसंगी दंत शल्य चिकित्सक डॉ. शुभदा बडवे, एनसीडी जिल्हा समन्वयक डॉ. यश प्रसादे, ग्रा.रू. पालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम अवतार मीना व डॉ. संजय श्रीखंडे, दंत शल्य चिकित्सक डॉ. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र खानूच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपशिखा, वालावलकर डेरवण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, नाणिजचे सरपंच विनायक शिवगण, कशेळीचे माजी सरपंच प्रकाश परपते, दशक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, तपासणीसाठी आलेले सर्व महिला व पुरुष, आशा सेविका, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना मोफत कॅन्सर तपासणीचा लाभ घेता आला, ज्यामुळे आरोग्यसेवेची उपलब्धता वाढण्यास मदत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 20-06-2025














