जाकादेवीत ट्रिपल सीट अपघातात पादचारी गंभीर जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यातील जाकादेवी बाजारपेठेत काल, १९ जून २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका भरधाव मोटारसायकलने पादचाऱ्याला धडक दिल्याने ६३ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. ओरी बौध्दवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या एम.एच.०८/बी.एच./४८४७ क्रमांकाच्या मोटारसायकलवर रोशन विनोद मोहिते (रा. काजर्ली, गुहागर) आणि जिया जितेंद्र मोहिते (रा. वरवडे, रत्नागिरी) यांना ट्रिपल सीट बसवून निवळी ते गणपतीपुळे रोडवरून जाकादेवी बाजारपेठेतून गणपतीपुळे दिशेने जात होता.

दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास, जाधवने स्वरूप हार्डवेअर दुकानातून बाहेर पडताना रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता मोटारसायकल भरधाव वेगाने चालवली. त्याने मोटारसायकल रस्त्याच्या उजव्या बाजूला नेऊन पादचारी रघुनाथ पांडुरंग खापले (वय ६३, रा. देवूड, रत्नागिरी) यांना धडक दिली. या अपघातात खापले यांच्या डोक्याला आणि डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, डाव्या हाताला, पायाला आणि गालाला किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

या घटनेनंतर, रिक्षाचालक विष्णू हरी घाणेकर (वय ४०, रा. देवूड, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी कुणाल जाधवविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १२८(१)/१९४(सी) नुसार गुन्हा (गु.र.नं. ११८/२०२५) दाखल केला आहे.

वाहनचालकांनो, सावधान!

हा अपघात पुन्हा एकदा ट्रिपल सीट आणि अतिवेगामुळे होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकतो. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून, जबाबदारीने वाहन चालवणे गरजेचे आहे. नागरिकांनी ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि पादचाऱ्यांनी रस्त्यावर चालताना अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 20-06-2025