देवरुखात नगरपंचायतीकडून शाळांना घरपट्टी आकारणी

देवरुख : शहरी भागातील सर्व शासकीय इमारतींना नगरपंचायत देवरुखकडून घरपट्टी आकारणी करण्यात आली आहे. या आकारणीमुळे शाळा व अंगणवाड्यांमधील शिक्षक व सेविकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. अचानक व मोठ्या रकमेची आकारणी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण आल्याचे दिसून येत आहे.

नगरपंचायतीच्या वसुली विभागाकडून घरपट्टीच्या पावत्या शाळा, अंगणवाड्या तसेच शासकीय इमारतींच्या कार्यालयांमध्ये देण्यात आल्या आहेत. यापूर्वी शाळांमधील वीजबिल शासन भरत असे. सध्या शासनाने वीज बिलाबाबत हात झटकल्यामुळे हे बिल शाळांनाच भरावे लागत आहे. शाळेतील शिक्षक बीज बिलाचा बोजा पालकांवर टाकत आहेत.

वीज बिल भरणा हे नियमित सुरू आहे. असे असतानाच सध्या नगरपंचायतींनी घरपट्टी आकारणी वसुली पावती दिल्यामुळे शिक्षकांसमोर नवीन आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाकडून घरपट्टी देयकाबाबतची तरतूद नसल्यामुळे, शिक्षकांसमोर घरपट्टी भरण्याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

शिक्षकांच्या हातात आलेली घरपट्टी देयकाची मोठी रक्कम शिक्षकांचे डोळे पांढरे करत आहे.घरपट्टीची पावती शिक्षकांच्या डोक्याला ताण देणारी ठरत आहे. दोन वर्ग खोल्या असलेल्या शाळांची घरपट्टी ही सुमारे १२ हजाराच्या घरात आहे. भव्य दिव्य शाळांची घरपट्टी आकारणीही ३५ ते ६० हजारांच्या घरात आली आहे. एवढी भली मोठी रक्कम कशी भरावी असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. यातून हे शिक्षक एकत्र येत असून त्यांच्या संघटनांद्वारे आवाज उठवला जाणार असल्याचे बोल शिक्षकांमधून उमटत आहेत. वेळ पडल्यास आंदोलने उभारण्याचा मनसुवा शिक्षक संघटनानी व्यक्त केला जात आहे.

नगरपंचायतीने घरपट्टी वसुलीसाठी तगादा लावल्यास शिक्षकांवर मोठे दडपण येण्याची शक्यता आहे. नगरपंचायत बजावलेल्या पावत्यानुसार वसुली करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे शिक्षक कोणती पावले उचलतात हे आगामी काळात दिसून येणार आहे.

घरपट्टी वसुलीचे आदेश २०१९ पासूनचे ..
शासनाकडून नगरपंचायतीला शासकीय इमारतींची घरपट्टी वसुली करण्याचे आदेश २०१९ साली आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी नगरपंचायतीकडून सन २०२५ २६ या सुरू असलेल्या वर्षापासून करण्यात आली आहे. यानुसार सर्व शासकीय इमारतींची मोजणी पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात शासकीय निकषानुसार इमारतींची आकारणी निश्चित करून आकारणी पावती वसुलीसाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा, एकात्मिक बाल विकास अंतर्गत असलेल्या अंगणवाड्या इमारती, नागरी अंगणवाड्या अशा इमारतींसह शासकीय सर्वच इमारतींना आकारणी पावती वसुलीसाठी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 20/Jun/2025