रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी फरार गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम राबवत, खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि गेल्या ९ महिन्यांपासून पॅरोलवर फरार असलेल्या चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार या कैद्याला नवी मुंबईतून अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कामगिरी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात चन्नाप्पा गंगवार (वय ३३) याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो मध्यवर्ती कारागृह, कोलवाड, गोवा येथे शिक्षा भोगत होता. दि. ०३/०७/२०२४ रोजी त्याला ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती आणि त्याने ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कारागृहात हजर राहणे बंधनकारक होते. पॅरोलच्या काळात तो रत्नागिरीत राहणार होता.
परंतु, गंगवार निर्धारित वेळेत कारागृहात हजर न झाल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या ९ महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, फरार चन्नाप्पा गंगवार हा नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने त्वरित कारवाई करत आज, २० जून २०२५ रोजी गंगवारला नवी मुंबईतून ताब्यात घेतले. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्यासह पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच असल्याचे दिसून येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 21-06-2025














