खेड : धोकादायक साकवावरून ओझरवाडीतील ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

खेड : भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत असतानादेखील खेड तालुक्यातील अनेक दुर्गम वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे घेरारसाळगड गावातील ओझरवाडी होय. येथे आजही ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून लाकडी साकवावरून प्रवास करावा लागत आहे.

देवघर व हुंबरी दरम्यानच्या ओझर खोंडीत वसलेल्या ओझरवाडीच्या विकासासाठी अनेक दशकांपासून मागणी होत असतानाही अद्याप पक्का रस्ता वा साकव उपलब्ध झालेला नाही. पावसाळ्यात ही वाडी पूर्णतः तालुक्यापासून तुटून जाते. अतिवृष्टीमुळे अनेकदा लाकडी साकव वाहून जातो आणि त्यामुळे येथील ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते.

शिक्षण व आरोग्य सुविधा ठप्प रस्त्याचा अभाव आणि साकवाची अस्थायी स्थिती यामुळे येथील विद्यार्थी पावसाळ्यात शाळेत जाऊ शकत नाहीत. परिणामी, तरुण पिढी शिक्षणापासून वंचित राहत आहे. तसेच रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी डोलीचा आधार घ्यावा लागतो ही परिस्थिती आजही कोणत्याही संवेदनशील प्रशासनाच्या मनाला हादरवणारी आहे.

ग्रामस्थांची शासनाकडे मागणी घेरारसाळगड गावातील ओझरवाडीला तातडीने पक्का रस्ता आणि साकवाची सोय करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी समाजसेवक रामचंद्र आखाडे यांनी पुढाकार घेतला आहे.

Khabardar diwali fest

ओझरवाडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, हीच सर्वांची अपेक्षा आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, हीच मागणी ग्रामस्थ आणि समाजसेवकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 23/Jun/2025