सावर्डे पोलिस ठाण्याचे काम सुरू

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात सावर्डे येथील पोलिस स्थानक, तलाठी कार्यालय आणि महापुरूष मंदिर बाधित झाले. या तिन्हींच्या पुनर्बाधणीसाठी सुमारे पावणेतीन कोटींचा निधी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केला. तब्बल तीन वर्षानंतर या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र एकाच जागेवर बांधण्यात येणाऱ्या मंदिरासह पोलिस स्थानक आणि तलाठी कार्यालयाच्या तयार केलेल्या आराखड्यात रस्ता आणि मंदिराचा समावेश नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि या कामांसाठी पाठपुरावा करणारे संदीप सावंत यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत चौकशीची मागणी केली आहे.

महामार्गात बाधित झालेल्या सावर्डे येथील तलाठी, पोलिस स्थानक व महापुरूष मंदिराबाबत पाठपुरावा करणारे संदीप सावंत म्हणाले, सरकारी काम अन सहा वर्षे थांब अशी येथे अवस्था आहे. या तिन्ही कामांना निधी मिळण्यासाठी २०२३ मध्ये आरती आंदोलन केले, त्यानंतरही दोन वेळा महामार्गावर आंदोलने केली, त्यानुसार आमच्यावर गुन्हे दाखल झाले.

या आंदोलनामुळे ११ ऑगस्ट २०२३ मध्ये तलाठी, पोलिस स्थानक व महापुरूष मंदिरासाठी २ कोटी ७१ लाख ३७ हजाराचा निधी मंजूर झाला. निधी उपलब्ध असतानाही गेल्या तिन वर्षात कामे सुरू झाली नाहीत. आता गेल्या आठवड्यापासून या कामांना सुरुवात झाली.

राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि उपविभागीय कार्यालय यांच्यातील पत्रव्यवहारात दोन वर्षाचा कालावधी गेला. कार्यालयाच्या मागील बाजूस मोठी लोकवस्ती आहे. या परिसरातून तेथील लोकांची ये-जा असते. मात्र, तलाठी व पोलिस स्थानक इमारतीच्या आराखड्यात मागील बाजू कडील लोकांसाठी रस्त्याचा समावेश केलेलाच नाही. शिवाय महापुरूष मंदिरासाठी १६.८५ लाख निधीची तरतूद असतानाही कामाच्या आदेशात त्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या निधीवर नेमका कोण डल्ला मारतंय असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

सुमारे २६ गुंठे जागेत कार्यालये आणि मंदिराचे काम होणार आहे. ही जागा उंचावर असल्याने तेथील उंची कमी करून रस्ता वाहतूकीस सुलभ करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली. ही कामे वेगाने व्हायला हवीत. मात्र दोन वर्षे काम रखडवणाऱ्यांची चौकशी होण्यासाठी रितसर तक्रार करणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 10/Jul/2025