रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसाठी ५ कोटींची प्रशासकीय मान्यता

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि चेंजिंग रूम्स बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विकास कामांना गती देणे आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम योजनेचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय कार्यकारिणी समिती, कोकण ग्रामीण पर्यटन विकास, रत्नागिरी यांनी विविध
समुद्रकिनाऱ्यांवर सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट व चेंजिंग रूमसाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

या कामांसाठीचा निधी उपलब्ध तरतूद आणि इतर जिल्ह्यांची मागणी विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने वितरित केला जाईल. अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे, स्वीकारणे, कार्यारंभ आदेश देणे आणि वस्तूंचा पुरवठा करताना शासनाच्या निविदा प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्याची जबाबदारीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहणार आहे.

या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील खालील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि चेंजिंग रूम्स बांधण्यात येतील. त्यामध्ये भाट्ये बीच, २ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि २ युनिट चेंजिंग रूम, गणपतीपुळे बीचवर ३ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि ३ युनिट चेंजिंग रूम, गणेशगुळे बीचवर १ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि १ युनिट चेंजिंग रूम, गावखडी बीचवर १ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि १ युनिट चेंजिंग रूम, वेळणेश्वर बीचवर २ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि २ युनिट चेंजिंग रूम, लाडघर बीचवर २ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि २ युनिट चेंजिंग रूम, आणि मुरूड बीचवर २ युनिट सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि २ युनिट चेंजिंग रूम या कामाचा समावेश असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 10/Jul/2025