रत्नागिरीतील सीसीटीव्ही दुरुस्त करा; मनसेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

रत्नागिरी : रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, अप्रिय घटनांचे वाढते प्रमाण आणि अंतर्गत सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरातील सदोष सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करा, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.

रत्नागिरी शहराचा विस्तार वाढत आहे. देशाच्या इतर भागांतून रेल्वेमार्फत मोठ्या प्रमाणात ये-जा होते. एकूणच शहरात होणारे स्थलांतर पाहता अंतर्गत सुरक्षिततेच्यादृष्टीने गांभीर्याने विचार केला पाहिजे.

पालिकेने आणि सभोवतालच्या परिसरातीतील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व गृहनिर्माण संस्था, खासगी आस्थापने यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात यावे. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून शहरात कार्यान्वित केलेली सीसीटीव्ही यंत्रणा सदोष आहे. ती सक्षम ठेकेदाराकडून सुरू करावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण यावर लवकरात कारवाई करू, असे आश्वासन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ, तालुका सचिव अॅड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 10/Jul/2025

Amey jwelrs