रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावरील ‘बसरा स्टार’ जहाज अखेर काढले जाणार : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरी, गुरुवार, ११ जुलै २०२५ : गेल्या पाच वर्षांपासून रत्नागिरी जवळच्या मिऱ्या किनाऱ्यावर खडकात अडकून पडलेले अजस्त्र ‘बसरा स्टार’ हे जहाज अखेर समुद्रातून बाहेर काढले जाणार आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने या जहाजाला भंगारात काढण्याची परवानगी दिल्याने, आता हे जहाज काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यामुळे हे जहाज भरकटत रत्नागिरीजवळच्या मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात अडकले होते. त्यावेळी जवळपास ३५ कोटी रुपये इतकी या जहाजाची किंमत होती. मात्र, गेली पाच वर्षे खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि कोणतीही देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे आता हे जहाज पूर्णपणे सडले आहे. समुद्राच्या लाटांमुळे जहाजाचे दोन तुकडे झाले आहेत.

सोशल मीडियावर रील्स बनवल्यामुळे हे जहाज सर्वदूर प्रसिद्ध झाले होते आणि अनेक पर्यटक त्याला पाहण्यासाठी मिऱ्या किनाऱ्यावर येत होते. आता हे जहाज अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जाणार आहे.

या जहाजाला बाहेर काढण्यासाठीची सर्व प्रक्रिया मार्च महिन्यातच पूर्ण झाली होती, परंतु त्यानंतर चार महिने उलटूनही जहाज भंगारात काढण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. आता परवानगी मिळाल्याने, येत्या महिन्याभरात हे जहाज समुद्रातून बाहेर काढले जाईल. जहाज बाहेर काढण्यासाठीचा संपूर्ण आराखडा (प्लॅन) तयार करण्यात आला आहे.

Shiva optical