रत्नागिरी : जिल्ह्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, या ध्येयाने प्राथमिक शिक्षण विभागाने एक व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांना शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम १ जुलै ते १५ जुलै दरम्यान राबवण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत, शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी गावोगावी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेत आहेत. बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठा, दगडखाणी आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम भागातील वाड्या, वस्त्या, तांडे आणि शेतमळ्यांमध्येही सर्वेक्षण केले जात आहे. जे विद्यार्थी कधीच शाळेत दाखल झाले नाहीत किंवा सलग ३० दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर आहेत, त्यांना या मोहिमेतून शोधून काढले जात आहे.
या सर्वेक्षणात आढळलेल्या मुलांना तत्काळ त्यांच्या घराजवळील शाळेत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागासोबतच महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, आरोग्य आणि गृहविभाग अशा विविध शासकीय यंत्रणा एकत्रपणे काम करत आहेत. सर्व विभागांच्या समन्वयातून शिक्षणापासून दूर राहिलेल्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने नागरिकांनाही सहभागाचे आवाहन केले आहे.
आपल्या परिसरात शाळाबाह्य मूल आढळल्यास त्याची माहिती शिक्षण विभागाला द्यावी, असे आवाहन व्हॉटस्अॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केले जात आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच शिक्षणाचा हा प्रवाह प्रत्येक मुलापर्यंत पोहोचेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तालुकास्तरावर समित्या गठित
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर तालुकास्तरीय समिती, केंद्रस्तरीय, वार्डस्तर, गाववार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या सर्वांनी सहभागी होऊन एकजुटीने सर्वेक्षणाचे काम करावयाचे आहे.
जिल्ह्यातील स्थलांतरित शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी १५ जुलैपर्यंत शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम शासनाच्या सर्व विभागाच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. तसेच ही मोहीम १५ जुलैपर्यंत न राबवता त्यापुढे सुद्धा जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत- वैदेही रानडे, (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रत्नागिरी)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 14/Jul/2025














