दापोली : शिवतर-खेड मार्ग खचल्याने वाहतूक ठप्प, ग्रामस्थांचे हाल

दापोली : दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांना जोडणारा पर्यायी व महत्त्वाचा शिवतर – जामगे खेड मार्ग मुसळधार पावसामुळे खचल्याने पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

या मार्गाचा वापर जामगे पंचक्रोशीतील नागरिक वैद्यकीय सेवा, शिक्षण, बाजारहाट व खेड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी करतात. मात्र सध्या रस्ता खचल्यामुळे अडचण होत आहे. विद्यार्थी, व्यापारी आणि वृद्ध नागरिक त्रस्त आहेत. आता साधे औषध आणायला, विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालय गाठण्यासाठी मोठे अंतर कापावे लागत आहे.

गणेशोत्सव अगदी काही आठवड्यांवर आला असताना, या मार्गाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकांचे हाल होत असल्याने प्रशासनाने त्याची दखल घेत त्वरित उपाययोजना करून रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा स्थानिकांनी इशाराही दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 17/Jul/2025