कौशल्य योजनांमधून व्यवसाय, शेती वाढवा : डॉ. अरुण यादव

रत्नागिरी : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि विविध कौशल्य योजनांचा लाभ घेऊन कोकणामध्ये व्यवसाय आणि शेतीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. अरुण यादव यांनी केले. कोकण कृषी विद्यापीठाच्या झाडगावमधील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामार्फत जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

युवा कौशल्य दिनाची यंदाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा वर्गाचे सक्षमीकरण अशी आहे. ग्रामीण विकासात समुदाय सहभाग कार्यक्रमांतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात कार्यानुभव कार्यक्रम झाला.

याअंतर्गत विद्यार्थ्यांनी मत्स्य व्यवसायामधील विविध विषयामध्ये सहभागाद्वारे अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी माशांचे बिज गोळा करणे आणि त्यांची वाहतूक करणे, मत्स्यालय व्यवस्थापन, पाण्याची प्रत तपासणी, शोभिवंत माशांचे संवर्धन, जल-पर्यटन, यांसारख्या विषयांमध्ये कामाचा अनुभव घेतला. या कार्यानुभव कार्यक्रमाचा सांगता समारंभमंगळवारी झाला. यावेळी मंचावर प्रा. श्रावणी विभुते, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि प्रमुख डॉ. केतन चौधरी, डॉ. आसिफ पागारकर उपस्थित होते. असे कार्यक्रम भविष्यातही आयोजन करण्याची विनंती केली.

डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयामध्ये सखोल प्रशिक्षण घेऊन व्यवसायामध्ये उतरण्याचे आवाहन केले. मत्स्य शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा वर्गाचे सक्षमीकरण करणे शक्य असल्याचे नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 17/Jul/2025