मंडणगड : कॉजवेंची पुलात रूपांतर करण्याची मागणी

मंडणगड : मॉन्सूनच्या कालावधीत ग्रामीण भागाचा रस्ते मार्गाने संपर्क प्रस्थापित राहावा, या उद्देशाने नव्वदच्या दशकात तालुक्यात उभे करण्यात आलेले बहुतांश साकव प्रवासास धोकादायक स्थितीत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात वाडीकोंडचे दळणवळण लक्षात घेऊन किमान पायी चालत जाणाऱ्यांसाठी सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी जुन्या साकवांची जागा कालसंगत कॉजवेंनी घेतली असली तरी बदलत्या काळानुसार कॉजवेचे रूपांतर मोठ्या पुलात करण्याची गरज आहे.

दरवर्षी पावसात गावोगावी नव्याने उभ्या करण्यात आलेल्या कॉजवेवरून वारंवार पाणी गेल्याने प्रश्नाची तीव्रता आणखीनच वाढताना दिसून येत आहे. तालुक्याची डोंगराळ संरचना व नद्यानाल्यांचे तुडुंब भरणे लक्षात घेता काही ठिकाणचे जुने साकव आजही उपयुक्त आहेत. कारण डोंगरदऱ्यात राहणाऱ्या ग्रामस्थांना पाण्याची पातळी उंच असताना या साकांचा वापर करावा लागतो. तालुक्यात सर्वच गावे व वाड्या मुख्य रस्त्याने गाडी मार्गास जोडल्या गेल्या आहेत, हे खरे असले तरी गावातील अंर्तगत प्रामुख्याने स्मशानभूमी व ग्रामदेवालयांकडे जाणाऱ्या पायवाटांवर तसेच दोन वाड्यांना जोडणाऱ्या पायवाटांवर आजही अनेक ठिकाणी साकवांचा वापर होतो.

गेल्या दशकात साकवांचे रूपांतर कॉजवेमध्ये करण्यात आले असले तरी नदीनाल्यांमध्ये पाण्याची वर्षागणिक वाढणारी पातळी लक्षात घेता अधिक उंचीच्या पुलांचीही मागणी गावागावांतून होत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी जुना साकव व नवीन कॉजवे असतानाही वाहतुकीची अडचण होताना दिसून येते. त्यामुळे तालुक्यातील जुने साकव दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे.

मंडणगड तालुक्यात लहान-मोठ्या दोनशेहून अधिक साकवांचा वापर रहदारीसाठी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या साकवांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना पूर्ववत करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढे यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 18/Jul/2025