रत्नागिरी शहर – रत्नागिरी शहरातील उदयमनगर येथील कबाब कॉर्नरसमोर गुरुवारी, १७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एका रिक्षाचालकाला दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही मारहाण करण्यात आली असून, यात रिक्षाचालक साहिल समीर सोलकर (वय २६, रा. शेट्येनगर, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी साहिल सोलकर यांनी गुरुवारी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फहद मस्ताक पाटणकर (रा. शिवाजी नगर, रत्नागिरी) आणि अयान मुल्ला (पूर्ण नाव, पत्ता अज्ञात) या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३६२, ३५१(२), १२७, ३(४) नुसार गुन्हा (गु.र.नं. ३२८//२०२५) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल सोलकर हे त्यांची रिक्षा (क्र. एम. एच. ०८ बीसी. ०१५०) घेऊन ओसवालनगरमार्गे हयातनगर रिक्षा स्टॉपकडे जात होते. खलपे हाऊससमोरील उदयमनगर येथे ते आले असता, आरोपी फहद पाटणकर आणि अयान मुल्ला हे त्यांच्या ॲक्सेस गाडीवरून आले आणि त्यांनी सोलकर यांच्या रिक्षाला कट मारून पुढे निघून गेले.
यानंतर त्यांनी गाडीवरूनच सोलकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मारण्याची धमकी दिली. आरोपी फहद पाटणकर याने “तू चंपक मैदानावर ये, मग तुला बघतो” अशी धमकी देऊन तो पुढे निघून गेला.
थोड्याच वेळात, आरोपींनी कबाब कॉर्नर, उदयमनगर येथे पुन्हा सोलकर यांच्या रिक्षाला ओव्हरटेक करून त्यांच्या रिक्षासमोर त्यांची ॲक्सेस गाडी आडवी लावली. हे पाहून सोलकर यांनी रिक्षा थांबवून आरोपी फहद पाटणकर याला “काय फालतूगिरी आहे?” असे विचारले. यावर आरोपी फहद पाटणकर याने सोलकर यांना पाठीमागून पकडून ठेवले, तर आरोपी अयान मुल्ला याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याव्यतिरिक्त, आरोपी फहद पाटणकर याने लोखंडी रॉडने सोलकर यांच्या दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर मारहाण केली, ज्यात त्यांना दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, भररस्त्यात घडलेल्या या मारहाणीच्या प्रकाराने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 18-07-2025














