अनुदान मिळताच नुकसान भरपाईचे वाटप : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मॉन्सूनचे प्रमाण कमी आहे. या पावसामध्ये ११६ ठिकाणी सुमारे ३ कोटी २५ लाख ८९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईचे अनुदान अजून प्राप्त झाले नाही. जसेजसे अनुदान प्राप्त होईल तसे ते वितरित केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत जून व जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणे भरत आली आहेत. जिल्ह्यात दीड महिन्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील २ व्यक्तींच्या कुटुंबीयांना ८ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पावसाळ्यात विविध दुर्घटनांमध्ये पाचजण जखमी झाले असून, त्यातील गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीची दहा हजारांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित जखमींवर औषधोपचार करण्यात आले. जिल्ह्यातन १३६ कच्च्या घरांचे सुमारे ४१ लाख ९० हजार २६५ रुपयांचे तर पक्क्या १९३ घरांचे ५८ लाखांचे नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात आतापर्यंत १० जनावरांचा मृत्यू झाला असून, २ जनावरांचे ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असून, उर्वरित जनावरांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुराचे पाणी घुसून ११ दुकानांचे १८ लाखांचे नुकसान झाले आहे.

पाणी घुसल्यामुळे किंवा अतिपावसामुळे जिल्ह्यात ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे १०० हेक्टरवरील शेतीचे २३ लाखांचे नुकसान झाले आहेत. एप्रिल व मे मध्ये आंबा व काजूच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. ५२ वीजखांब, १२ ट्रान्सफॉर्मर, ७ विहिरींचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ शाळांचे १५ लाख ५४ हजारांचे नुकसान झाले.

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 21/Jul/2025