रत्नागिरी : जिल्हयात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. शनिवार १६ ऑगस्ट रोजी दहिकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात या वर्षी सार्वजनिक २७० आणि २४८० खासगी दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी सार्वजनिक दहिहंड्यांमध्ये १९ दहीहंड्यांची वाढ झाली आहे. मात्र, खासगी दहिहंड्यांमध्ये १३२ दहीहंड्यांची घट झाली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रुपये किमतीच बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळवण्यासाठी मंडळांमधील चुरस व थरार अनुभवण्यास मिळणार आहे. दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे गोविंदा पथकांकडून जोरदार सराव सुरु झाला आहे. श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. गतवर्षी २०२४ मध्ये जिल्ह्यात २५१ सार्वजनिक तर २६१२ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या विविध ठिकाणी सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्ह्यातील पथकांसह जिल्ह्या बाहेरची पथकेही येतात. सध्या दहीहंड्यांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा लागली आहे. दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करताना सिने कलाकार, वाहिन्यांचे कलाकार, ऑर्केस्ट्रा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 15/Aug/2025













