दानशूर भागोजीशेठ कीर जमिनीचा तिढा, प्रशासनाच्या निषेधार्थ स्वातंत्र्यदिनी भर पावसात उपोषण

रत्नागिरी : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या मालकीच्या जागा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांच्या वंशजांना हस्तांतरित न करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या विरोधात आज स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीत आवाज उठवण्यात आला. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि भागोजीशेठ कीर प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भर पावसात एकदिवसीय उपोषण केले. अखेर, तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी तात्काळ विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या जागा त्यांच्या वंशजांना देण्याबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, या आदेशाला अनेक दिवस उलटूनही महसूल प्रशासनाने अद्याप काही जागा वंशजांच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानामुळे भंडारी समाजात आणि कीर प्रेमींमध्ये तीव्र नाराजी होती. याच नाराजीला वाचा फोडण्यासाठी आज १५ ऑगस्टच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले.

या आंदोलनात भंडारी समाजाचे नेते रमेश कीर, भंडारी समाज अध्यक्ष राजीव कीर, कार्यवाह चंद्रहास विलणकर, सहकार्यवाह अमृता मायनाक, साईनाथ नागवेकर यांच्यासह समाजबांधव आणि कीर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसातही आपल्या मागण्यांसाठी ते ठाम होते.

आंदोलनाची दखल घेत रत्नागिरीचे तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांची बाजू ऐकून घेतली व हा विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आणि विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषण सुटल्यानंतर सर्व उपोषणकर्त्यांनी पतितपावन मंदिरात जाऊन दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या आंदोलनात ॲड. प्रज्ञा तिवरेकर, ॲड. आश्विनी आगाशे, सौ. अस्मिता चवंडे, विजय बिर्जे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 15-08-2025