रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पानवल युवासेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी, विशेषतः तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आदर्श प्रस्थापित केला.
पानवल युवा सेनेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आपली सामाजिक जबाबदारी जपण्याची ही परंपरा कायम ठेवत, यावर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी रक्तदानासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यामध्ये युवा वर्गासह महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, हे या शिबिराचे वैशिष्ट्य ठरले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, पानवल उपसरपंच रवींद्र मांडवकर, युवासेना विभागप्रमुख अमित तोडकर, उप-विभागप्रमुख अभिजीत घोडके, शाखाप्रमुख निखिल तांबे यांच्यासह युवासेनेचे सर्व पदाधिकारी, युवासैनिक आणि शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
एकूण ३५ ग्रामस्थांनी रक्तदान करून या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे युवा सेनेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्य दिनी झालेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 15-08-2025














