रत्नागिरी : जिल्हा परिषदेमार्फत तालुक्यातील गोळप येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या ९ महिन्यांच्या कालावधीत ९ लाख ५० हजार ९३९ युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. या वीज निर्मितीतून जिल्हा परिषदेला तब्बल ४२ लाख ७९ हजार २२९ रुपये इतके आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. या वीज निर्मितीमधून सर्व ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजबिल शून्यावर आणणे, हेच जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे.
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑगस्ट २०२४ मध्ये गोळप येथे १,००० किलो वॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. स्वयंचलित सौर पॅनेल असणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात आला असून, गोळप ग्रामपंचायतींच्या केवळ ५ गुंठे जागेत तो उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून वार्षिक १७ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
या सौर ऊर्जा प्रकल्पातून मागील ९ महिन्यात ९ लाख ५० हजार ९३९ इतक्या युनिटची वीजनिर्मिती करण्यात यश आले आहे. या प्रकल्पामुळे गोळप ग्राममपंचायतीचे वीजबिलापोटी १८ लाख आणि अन्य ग्रामपंचायतीचे सुमारे एक कोटी रुपये वाचणार आहेत. सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांसाठी वर्षाला २२ लाख ८० हजार युनिट, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ लाख ५० हजार ७७३ युनिट असा एकूण अंदाजे ११ लाख ५० हजार युनिट्सचा वापर होतो. ग्रामपंचायतीच्या पथदीपांच्या वीजबिलापोटी होणारा खर्च शून्यावर आणण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून सुरू आहे.
आणखी एका प्रकल्पाला मंजुरी
रत्नागिरी तालुक्यातील मौजे कापडगाव येथे १ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभिजीत गडदे यांनी दिली.
मौजे वरवेली येथील दुसरा प्रकल्प पूर्णत्वाकडे
गोळप प्रकल्पापाठोपाठ गुहागर तालुक्यातील एक मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून, तो लवकरच पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प झाल्यावर येथील ग्रामपंचायतींचे वीजबिल शून्यावर येणार आहे.
पथदीपांसाठी ११ लाख युनिटचा वापर
जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदीपांसाठी वर्षाला २२ लाख ८० हजार युनिट, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ लाख ५० हजार ७७३ युनिट असा एकूण अंदाजे ११ लाख ५० हजार युनिट्सचा वापर होतो.
दरवर्षी १९ लाख युनिटची निर्मिती करण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे. या वीज विक्रीचा करार रायगड येथील सॅनिओ कंपनीशी केला आहे. या रकमेतून ग्रामपंचायतीच्या पथदीपांची वीज देयके अदा करण्यात येणार आहेत
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 15/Aug/2025













