देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. हर्षद संजय रांधिम (वय १७ रा. कनकाडी गराटेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. तर एकुलत्या मुलाने आत्महत्या करून जीवन संपवल्याने रांधिम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जेवण करून हर्षद नेहमीप्रमाणे घरी झोपला होता. बुधवारी सकाळी घरातील माणसे उठल्यानंतर ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना मागील पडवीत हर्षद गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. हे दृश्य पाहताच त्याची आई व बहिणीने टाहो फोडला. आरडाओरड झाल्यावर वाडीतील लोकांनी घराकडे धाव घेतली. हर्षदने गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर याबाबतची माहिती पोलीस पाटील समीक्षा खांदारे यांनी साखरपा पोलीस दूरक्षेत्रात माहिती दिली.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, हे. कॉ. नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. दरम्यान, हर्षदने आत्महत्येसारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा पोलीस करीत आहेत. हर्षदचे वडील हे सांगली येथे कामानिमित्त असतात. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आल्यावर ते कनकाडीत दाखल झाले आहेत. हर्षदच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. दरम्यान, हर्षदने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 20/Aug/2025












