Breaking : चिपळूणमध्ये पूल कोसळला, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल; दसपटीतील गावांचा संपर्क तुटला

चिपळूण, दि. २३: गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणारी एक मोठी घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील पिंपळी नदीवरील जुना पूल काही वेळापूर्वी कोसळला. या घटनेमुळे चिपळूण शहरातून दसपटी भागाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, सुमारे दहा ते पंधरा गावांचा थेट संपर्क तुटला आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांचे, विशेषतः मुंबईकरांचे मोठे हाल होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक तासापूर्वी पिंपळी नदीवरील हा पूल अचानक कोसळला. सुदैवाने, ज्यावेळी पूल कोसळत होता, त्याचवेळी जवळून जाणारी एक प्रवासी रिक्षा थोडक्यात बचावली, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

या दुर्घटनेमुळे चिपळूणमधून कान्हे, पिंपळी, खडपोली एमआयडीसी आणि दसपटीतील अनेक गावांकडे जाणारा मुख्य मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना आता लांबच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे, ज्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्हींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. विशेषतः गणेशोत्सवासाठी मुंबई आणि इतर शहरांतून येणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

जुना आणि धोकादायक पूल

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेला हा पूल सुमारे वीस मीटर लांबीचा होता आणि तो १९७१ मध्ये बांधण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून हा पूल कमकुवत आणि धोकादायक बनला होता. त्याच्या पुनर्बांधणीची मागणी सातत्याने केली जात होती.

पालकमंत्र्यांनी दिले होते पुनर्बांधणीचे आश्वासन

उल्लेखनीय आहे की, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण दौऱ्यावर असताना एका बैठकीत या पुलाच्या दुरवस्थेची दखल घेतली होती. हा पूल एमआयडीसीमार्फत नव्याने उभारण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. आता या भागातील वाहतूक लवकरात लवकर कशी सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.