दिल्ली पोलिसांच्या लाठीचारावर अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी; गदारोळामुळे संसदेचे कामकाज तहकूब
Opposition Protest In Parliament: नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून विरोधी पक्षांनी संसदेच्या प्रांगणात आणि सभागृहात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात उपस्थित न राहिल्याने शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. “आओ ना, डरो मत, माहितीय तुम्ही ५६ इंचवाले आहात. संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी राजकीय धुलाई करतील,” अशा तिखट शब्दांत राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
‘अमित शाह जवाब दो’ – प्रियंका गांधी यांची आग्रही मागणी
संसद परिसरातील गांधी पुतळ्यापासून मकर द्वारापर्यंत विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी ‘अमित शाह जवाब दो’ असे फलक हातात धरून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. २० जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अधिकृत निवेदन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत गृहमंत्री संसदेत येऊन भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत हा तिढा कायम राहील, असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला.
सभागृहाचे कामकाज विस्कळीत
विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज प्रभावित झाले. सकाळी ११ वाजता सुरू झालेले लोकसभेचे कामकाज विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर राज्यसभेचे कामकाजही अवघ्या अर्ध्या तासात विस्कळीत झाले. गदारोळाच्या पार्श्वभूमिवर सरकार लोकसभेत चार महत्त्वाची विधेयके सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे – अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई, राम मंदिरातील प्रसादाची चोरी, महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि एफसीआरए (FCRA) दुरुस्ती विधेयक यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. “विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या का फेकल्या गेल्या आणि विजेचे धक्के का दिले गेले? सरकार या प्रश्नांची उत्तरे का देत नाही आणि चर्चेपासून का पळ काढत आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 10-08-2026













