NCP SP MPs Meet PM Modi: शरद पवारांच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?

सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवारांच्या आरोग्याची विचारणा

NCP SP MPs Meet PM Modi: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. सुमारे १५ मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील तसेच राज्यातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारणा केली. यासोबतच, “शरद पवार यांच्यातील ऊर्जेचा (Energy) सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी शरद पवारांचे कौतुक केले. यानंतर सर्व खासदारांनी आपापल्या क्षेत्रातील महत्त्वाच्या मागण्या पंतप्रधानांसमोर मांडल्या.

खासदारांनी मांडलेले प्रमुख मुद्दे व मागण्या:

  • बीडचा पाण्याचा प्रश्न व ‘पीएम केअर’ निधी: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा मांडत उजनी धरणातून बीड जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच ‘पीएम केअर’ निधीतून खासदारांना मिळणाऱ्या ३५ वैद्यकीय प्रकरणांच्या मर्यादेत वाढ करून ती सर्व लोकप्रतिनिधींसाठी लागू करावी, अशी सूचना केली.
  • नवी मुंबई विमानतळ नामकरण: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला. राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याने केंद्र सरकारने यावर तातडीने अंतिम निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
  • आरोग्य व पायाभूत सुविधा: नगरचे खासदार डॉ. निलेश लंके यांनी कर्करोगाच्या उपचारासंदर्भात व वाढत्या प्रादुर्भावाबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले, तर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बहुप्रतिक्षित नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली. याशिवाय खासदार अमर काळे यांनीही वर्धा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांकडे लक्ष वेधले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 10-08-2026