Chiplun : रांगोळीतून मांडला महामार्गावरील खड्ड्यांचा त्रास

चिपळूण : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भोगाळे मैदानात प्रसिद्ध रांगोळीकार संतोष केतकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यातून होणाऱ्या प्रवासाचे आणि कोकणवासीयांकडून संताप व्यक्त करणारी विशेष रांगोळी साकारली आहे.

संतोष केतकर हे आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर सातत्याने भाष्य करत असतात. नवा कालभैरव मंदिरात त्यांनी चालत (हलती) रांगोळी करून प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिन वादनाचे दृश्य साकारले होते. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२२ मध्ये नोंद झाली होती. त्यांनी भोगाळे मैदानात साकारलेल्या नवीन रांगोळीत महामार्गावरील खड्ड्यांचा प्रत्यक्ष अनुभव दाखवला आहे. गणपतीच्या हातात ठेवलेल्या फलकांवर लिहिले आहे, ‘चला गणराया, पहाया रस्ता ! खड्डे मोजू चला!’ तसेच ‘जास्त खड्डे, जास्त निधी’ असे संदेश देऊन त्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्यांनाही टोला मारला आहे.

ही रांगोळी प्रवाशांच्या दैनंदिन संघर्षाचे, प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि समाजातील संतापाचे सजीव दृश्य तयार करते. स्थानिकांनी आणि कला रसिकांनी संतोष केतकरांच्या या कलाकृतीचे कौतुक केले आहे. रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक जागरूकता वाढवण्याची ही प्रयोगात्मक पद्धत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे.

माझ्यासाठी रांगोळी ही फक्त कला नाही, ती सामाजिक संवादाचे माध्यम आहे. प्रवाशांचा त्रास आणि आमच्या रस्त्यांची अवस्था लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट आहे- संतोष केतकर, कलाकार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 01-Sep-2025