राजापूर : राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान एका वीस वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. विक्रांत संतोष पोकळे (२०) असे मयत तरुणाचे नाव आहे.
राजापूर तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज मंगळवारी गौरी गणपतीचे विसर्जनही मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले दरम्यान कोंडसर बुद्रुक नवेदर येथील गणपतीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. नवेदर गावातील गणपतींचे गावातीलच एका तळ्यात विसर्जन केले जाते. मंगळवारी सायंकाळी गावातील सर्व ग्रामस्थ गणपतींचे विसर्जन करून घरी परतल्यानंतर विक्रांत संतोष पोकळे हा युवक घरी परत न आल्याने कुटुंबीयांसह वाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता विक्रांत हा गणपती विसर्जन करण्यात येणाऱ्या तळ्यात बुडून मयत झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेने नवेदर गावातील गणेशोत्सवाला गालबोट लागले असून पूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:30 PM 03-Sep-2025














